जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते; पट्ठ्याने वेळोवेळी मिळालेले अपयश हे अधिकारी होऊनच धुवून काढले

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेमध्ये एका गोष्टीची नितांत गरज असते ती म्हणजे, एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी! जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते. हे विठ्ठल गणपत हराळे यांनी सिद्ध करून दाखवले. माढा तालुक्‍यातील उपळाई खुर्द येथे अत्यंत गरीब कुटुबांत विठ्ठल गणपत हराळे यांचे बालपण आणि शैक्षणिक जीवन गेले. त्यांनी अगदी लहानपणापासून गरीबी बघितली होती. प्रचंड आर्थिक चणचण, जमीनीवर उत्पन्न नाही,दुष्काळ भाग आणि कुटुंबाचा असणारा भार हे सारंकाही त्यांनी सोसलं आणि भोगलेलं होतं. एवढेच नाहीतर त्यांच्या वडिलांना मोलमजुरी करून कुटुंबाचा गाढा चालवायला लागत होता.त्यांच्या वडिलांना मोठ्या चार बहिणी व दोन मुलांना शिक्षण देत असताना कुटुंब खासगी सावकारकीमध्ये अडकल्याने दोन एकर जमीन विकावी लागली होती. पण मुलांच्या शिक्षणास कोणताही अडथळा वडिलांनी येऊ दिला नाही.

आपल्या मुलांनी देखील अधिकारी व्हावे,अशी वडिलांची प्रबळ इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर अधिकारी होण्याचा प्रवास सुटू झाला होता. विठ्ठल हराळे दहावीत बोर्डाच्या परीक्षेत शाळेत प्रथम आल्यावर वडिलांच्या इच्छा अजून वाढल्या. परंतु घरच्या परिस्थितीमुळे ज्या शाळेत विठ्ठल दहावीत पहिला आला त्या शाळेत उन्हाळी सुट्टीत गवंड्यांच्या हाताखाली विटा देण्याचे काम केले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, देवापूर येथे कोणताही क्‍लास न लावता बारावीमध्ये 84 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. यशाचा एक-एक डोंगर सर करत असताना काही दिवसांतच त्यांच्या या वाटचालीत अनेक अडथळे आले. पण इच्छा आणि जिद्द या जोरावर नेहमीच ते यशासाठी लढत राहिले. अचानक वडिलांना विजेचा शॉक लागला.त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ते थोडी खचले पण या प्रसंगाने आपले ध्येय ते विसरले नाहीत. आणि सुरु झाला अजून खडतर प्रवास.

वडिलांचे छत्र हरविल्याने घरचा आर्थिक कारभार बिघडला. त्यांच्या डोक्‍यावर कायम असलेला वडिलांचा आशीर्वादाचा हात निर्जीव झाला.घर चालविण्यासाठी त्यांची आई अनेक कामे करून पै-पै जमा करून आपला फाटका संसार चालवू लागली. विठ्ठल यांची शिक्षणासाठीची धडपड बघून मोठा भाऊ बिरुदेव यांनी पदवीचे शिक्षण अर्धवट सोडून भावाच्या शिक्षणासाठी शेतात काबाडकष्ट करून शिक्षणासाठी पैसे पुरवले. हे सर्व पाहून विठ्ठल यांचे ध्येय आणखी बळकट होऊ लागले. आईची शिक्षणाविषयी खूपचं जवळीक होती.त्यांच्या आई-वडीलांना देखील लेकरांनी‌ शिकावं,मोठ्ठं व्हावं हे नेहमीच वाटायचं. त्यांना आई व मोठ्या भावाने काबाडकष्ट करीत कराड येथे औषधनिर्माण शास्त्र विद्यालयात पुढील शिक्षणासाठी पाठविले. जेथे इच्छाशक्ती असते तेथे संधी आपोआप मिळत असते. तयासाठी मग कितीही मोठे अडथळे वा मर्यादा आल्या तरी यश मिळते, हा विचार विठ्ठल यांच्या मनात ठसून भरला होता. म्हणूनच त्यांनी शिक्षणाची वाटचाल अगदी वेगाने सुरू केली. उच्च पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या नामांकित कंपनीत नोकरीच्या संधी होत्या. परंतु, वडिलांनी बघितलेले स्वप्न व आई व भावाच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्धार केला.

म्हणतात ना कि एखाद्या गोष्टीला मनापासून मागितले आणि खूप कष्ट घेतले तर ती गोष्ट तुम्हाला मिळतेच. तसेच या कष्टांचे फळ विठ्ठल यांना मिळाले. अखेर 2019 मध्ये विठ्ठल यांचे राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही. त्यामुळे विठ्ठल हे निराश झाले पण हार मान्य करायची नाही अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. अपार परिश्रम करत जिद्द,ध्येय यांच्या बळावर 2019 मध्ये विठ्ठल यांनी अखेरीस राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. विक्रीकर निरीक्षक परीक्षेत एनटीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांचा हा खडतर प्रवास नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतो आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com