कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई – उदय सामंत

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सोप्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असून त्यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. अशातच अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही हा प्रश्न उद्भवल्यापासून कोरोना काळात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातही भीती निर्माण झाली होती.

विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये.’ तसेच ‘जर कोणत्याही उद्योग समूहाने किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना ते कोरोना वर्षातील उत्तीर्ण असल्याने निवडीच्या प्रक्रियेत भेदाभेद केले, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या उद्योग, व्यवसायांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विविध विद्यापीठांनी आखलेल्या नियोजनानुसार, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षा द्यावी.’ असंही उदय सामंत म्हणाले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com